
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील मित्रांच्या आनंदावर विरजण पडल्याची घटना घडली आहे. येथील शेततळ्यात शनिवारी मुंबईतील सिद्धांत जाधव (24) हा तरुण बुडाला. आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. सिद्धांत हा मूळचा कणकवली तालुक्यातील नरडवे येथील रहिवासी होता आणि सध्या मुंबईतील सांताक्रुझ येथे राहत होता.
सांताक्रुज येथील 15 मित्रांचा एक समूह 10 जुलैला कोकिसरे येथील प्रसाद वळंजू या आपल्या मित्राच्या गावी फिरण्यासाठी आला होता. शनिवारी दुपारी सर्वजण बंधाऱ्याजवळ पार्टी करत होते. काही जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. यावेळी सिद्धांत कधी पाण्यात बुडाला हे कोणालाच कळले नाही. सायंकाळी सिद्धांत आपल्यासोबत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शोध घेण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर रविवारी सकाळी बंधाऱ्यात सिद्धांतचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






























































