
तलासरीजवळील सावरोली गावाच्या हद्दीत भररस्त्यात आज पहाटे चारच्या सुमारास एलएनजी (द्रविकृत नैसर्गिक वायू) गॅस वाहून नेणारा टँकर अक्षरशः आडवा झाला. त्यात घातक गॅस असल्याने सुरक्षा यंत्रणांची धावाधाव झाली. १०० मीटर परिसर सील करण्यात आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही भीषण दुर्घटना घडली नाही. मात्र काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान या घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुजरातहून मुंबईच्या दिशेने एलएनजी गॅस टँकर भरधाव वेगात जात होता. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने अवजड टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या भागात जाऊन थेट डाव्या बाजूला उलटला. त्यातील गॅस बाहेर न आल्याने पुढील अनर्थ टळला. पण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार समजताच महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, नॅशनल हायवेची टीम तातडीने दाखल झाली. धोका लक्षात घेऊन त्वरित अपघातस्थळाच्या परिसराला सुरक्षा दोरीने वेढण्यात आले.
उघड्यावर चूल न पेटवण्याचे आवाहन
टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने तत्काळ तज्ज्ञांनाही पाचारण केले. त्यानंतर आजूबाजूच्या काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. महामार्ग पोलीस तसेच गुजरात एनर्जी लिमिटेडचे डेप्युटी मॅनेजर ब्रीज पटेल यांनीही घटनास्थळी धाव घेऊन सावरोली गावातील रहिवासी व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धोक्याची कल्पना दिली. एलएनजी गॅस हा ज्वलनशील असल्याने काही काळ कुणीही उघड्यावर चूल पेटवण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन करण्यात आले.
चालकाची कसून चौकशी
तज्ज्ञांच्या पाहणीनंतर दुर्घटनाग्रस्त टँकरमधील एलएनजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तब्बल आठ तासांनंतर ही मोहीम फत्ते झाली. तोपर्यंत अत्यंत काळजी घेण्यात आली होती. दरम्यान टँकरचालकाची कसून चौकशी केली जात असून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.






























































