FIFA World Cup 2026 – आरपार युरोपियन वॉर! फ्रेंच वादळाला स्पॅनिश अडथळा, एम्बाप्पे आणि यमाल भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपचा फुटबॉलसम्राट कोण याचा निकाल आता टेक्सासच्या हिरवळीवर लागणार आहे. एका बाजूला एम्बाप्पेच्या वेगावर स्वार झालेलं फ्रेंच वादळ, तर दुसऱ्या बाजूला यमालच्या जादुई डाव्या पायावर थिरकणारे स्पॅनिश साम्राज्य. वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत मंगळवारी रंगणारी ही लढत केवळ अंतिम फेरीच्या तिकिटासाठी नाही, तर युरोपियन फुटबॉलच्या सिंहासनासाठीची रणधुमाळी आहे. त्यामुळे एटी अॅण्ड टी स्टेडियममध्ये तोफेच्या आवाजाऐवजी गोलांचा गजर, रणगाडय़ांऐवजी चेंडूचा पाठलाग आणि सेनापतींच्या जागी एम्बाप्पे, यमाल, डेम्बेले, पेड्री आणि रोद्री मैदानावर उतरतील. टेक्सासमध्ये 90 मिनिटांसाठी फुटबॉलचा ‘युरोपियन वॉर’ पेटणार असून, त्यातून फक्त एकच महासत्ता जगज्जेतेपदाच्या संघर्षात उडी मारतील.

यंदा भन्नाट फॉर्मात असलेला दोन वेळचा विश्वविजेता फ्रान्स 2010 च्या जगज्जेत्या स्पेनशी भिडेल. दोन्ही संघांची वाटचाल दमदार झाली असली तरी, फ्रान्सची आक्रमकता आणि सातत्य पाहता ‘ले ब्ल्यू’चे पारडे किंचित जड मानले जात आहे. गटफेरीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडणाऱ्या डिडिएर देशाँ यांच्या संघाने बाद फेरीत स्वीडनला 3-0, पराग्वेला 1-0 आणि उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोला 2-0 असे नमवत उपांत्य फेरी गाठली. सहा सामन्यांत तब्बल 16 गोल झळकवत फ्रान्सने आपल्या आक्रमणाची ताकद सिद्ध केली आहे. बचावफळीही तितकीच भक्कम ठरली असून सलग तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना गोलच करू दिलेला नाही.

या यशामागे अर्थातच किलियन एम्बाप्पे हे सर्वात मोठे अस्त्र आहे. आठ गोल झळकवत तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याला उस्मान डेम्बेले, मायकल ओलिसे, डिझिरे डुए, तर मध्यफळीत ऑरेलियन त्शुआमेनी आणि
ऑड्रियन राबिओ यांची भक्कम साथ लाभली आहे.

स्पेनची वाटचाल मात्र फ्रान्सइतकी सहज नव्हती. ऑस्ट्रियावर 3-0, पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवत ‘ला रोजा’ने उपांत्यपूर्व फेरी गाठली. बेल्जियमविरुद्ध मात्र त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला आणि मिकेल मेरिनोच्या निर्णायक गोलने 2-1 असा विजय मिळवत त्यांनी अखेर उपांत्य फेरी गाठली.

स्पेनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा चेंडूवरील ताबा. रोद्रीचा खेळावरील ताबा, पेड्रीची कलात्मकता, डानी ओल्मोची चपळाई आणि अवघ्या किशोरवयात जगाला वेड लावणारा लामिन यमाल यांच्यावर स्पेनची मोठी भिस्त असेल. यमालने या स्पर्धेत अनेकदा बचावफळ्यांची झोप उडवली आहे, तर मेरिनोने सलग बाद फेरीत निर्णायक गोल करत ‘सुपर सब’ची भूमिका निभावली आहे.

इतिहासही या लढतीला वेगळं महत्त्व देतो. गेल्या वर्षी नेशन्स लीगच्या उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सचा 5-4 असा थरारक पराभव केला होता. त्यामुळे देशाँ यांच्या संघाकडे त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. दुसरीकडे, 2010 नंतर पहिल्यांदाच विश्वचषक अंतिम फेरीचं स्वप्न पाहणाऱ्या स्पेनला आणखी एक मोठा अडथळा पार करायचा आहे.

पुनरावृत्ती की हिशेब चुकता

फ्रान्स आणि स्पेन आजवर तब्बल 38 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात स्पेनने 18, तर फ्रान्सने 13 सामने जिंकले असून 7 सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे आकडेवारीचा काटा ‘ला रोजा’कडे झुकतो. मात्र विश्वचषकाचा इतिहास वेगळीच गोष्ट सांगतो. दोन्ही संघ विश्वचषकात फक्त एकदाच भिडले आहेत आणि 2006 च्या जर्मनी विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनने आघाडी घेतल्यानंतरही झिनेदिन झिदानच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने 3-1 असा दमदार विजय मिळवत स्पेनला घरी पाठवले होते.

आता तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा विश्वचषकात हे दोन युरोपियन महासत्ता समोरासमोर उभे ठाकले आहेत. मात्र यावेळी स्पेनकडे लामिन यमालचा, तर फ्रान्सकडे एम्बाप्पेचा तुरपाचा एक्का आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार, की स्पेन जुना हिशेब चुकता करणार याकडे संपूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे.