चेंबूर झाड दुर्घटनेत उद्यान आणि रस्ते विभागाला ‘क्लीन चिट’ , चौकशी अहवाल सादर; कंत्राटदार, सल्लागाराला दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ ३० जून रोजी शाळेच्या बसवर झाड पडून विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तांत्रिक बाबी वगळता झाड दुर्घटनेला इतरही काही कारणे असल्याचे सांगत, वेगवान वारे आणि जोरदार पावसाकडे अंगुलिनिर्देश करण्यात आल्याचे या अहवालात नमूद आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालात समितीने रस्ते आणि उद्यान खात्याचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच सल्लागार आणि अभियंते यांनाही क्लीन चिट दिली आहे. मात्र, कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या घटनेचे एक कारण असू शकते, असा ठपका ठेवत कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे सल्लागार मे. माहिमतुरा कन्सल्टंट यांनाही २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

‘क्रिटिकल रूट झोन’मध्ये झाडांच्या बुंध्याभोवती होणारे अतिरिक्त काँक्रिटीकरण कमीत कमी करावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. दरम्यान, या अहवालामुळे दुर्घटनेचा ठपका ठेवून करण्यात आलेले अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द होणार आहे.

अशी दिली क्लीन चिट:

झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान काम सुरू होते. या कामांबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वेळोवेळी कळविले होते. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये उद्यान विभागाचा कोणताही दोष सकृत्दर्शनी दिसून येत नाही. झाड वाचविण्यासाठी झाडाचा परिघ सोडून रस्ते विभागाने सुरक्षित अंतर ठेवून पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम केले, जेणेकरून त्या ठिकाणी पर्जन्यजलवाहिनीचे पाणी तुंबणार नाही. त्यामुळे या दुर्घटनेत रस्ते विभागाचादेखील कोणताही दोष नाही.