भाजपच्या महामंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा, पण महिना उलटूनही अटक नाही; शिवसेनेची दहिसर पोलीस ठाण्यावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपचा दहिसर विभागाचा महामंत्री सुरज प्रतापसिंग देवडा याच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तक्रार करून महिना उलटला तरी आरोपी अद्याप मोकाट आहे. पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज दहिसर पोलीस ठाण्यावर धडकले. आरोपीला आठ दिवसांत बेड्या ठोका अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

लग्नाचे आणि नोकरीचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाचा महामंत्री सूरज प्रतापसिंग देवडा याने एका तरुणीची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र एक महिना उलटून गेला तरी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिष्टमंडळ आज शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पोलीस ठाण्यात धडकले.

पोलिसांनी एका आठवड्यात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मात्र आरोपीला अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला. यावेळी प्रवीण पुवळेकर, बापूसाहेब गेजगे, कुंदा भरणे, दीपा चुरी, उषा कोरगावकर, रोशनी गायकवाड, वर्षा चोरगे, शैला गंगावणे, संजना वेंगुर्लेकर, स्वाती बोरकर, स्नेहा कोटकर, दीपाली अवारी, छाया आमरुळे, हेमा मयेकर, नंदा वंजारे, फोरम परमार, युगा राऊत, धनश्री चव्हाण उपस्थित होते.