हिंदुस्थानी रणरागिणींकडून लॉर्ड्सवर तिरंगा; इंग्लंडला फिरकीच्या जाळय़ात अडकवत एकमेव कसोटीत बाजी, क्रांती गौड ठरली ‘सामनावीर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने लॉर्ड्स ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडचा धुव्वा उडवत एकमेव कसोटी सामना तब्बल 270 धावांनी जिंकला. चौथ्या दिवशी अवघ्या दीड तासात हिंदुस्थानने इंग्लंडचा दुसरा डाव 62.5 षटकांत 186 धावांत गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने मिळवलेला हा हिंदुस्थानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.

हिंदुस्थानी महिलांनी 285 धावसंख्या उभारल्यानंतर इंग्लंडला 170 धावांवर रोखून पहिल्या डावात 115 धावांची मोठी आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुसरा डाव 7 बाद 341 धावांवर घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 457 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले. तिसऱ्या दिवसाच्या 6 बाद 130 धावसंख्येवरून चौथ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केलेल्या इंग्लंडला कधीच सामन्यात पुनरागमन करता आले नाही. चौथ्या दिवशी कर्णधार हरमनप्रीत कौरने सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखवला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अर्धशतक झळकवणाऱ्या एमी जोन्सने चौथ्या दिवशी केवळ दोन धावांची भर घातली. ती 54 धावांवर बाद होताच इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा गुल झाली.

पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या क्रांती गौडला दुसऱ्या डावातही दोन बळी मिळाले. मात्र, तिची आणखी विकेट्स मिळवण्याची संधी हुकली. कारण क्रांतीच्या गोलंदाजीवर सोफी एक्लेस्टोनला दोन वेळा जीवदान मिळाले. प्रथम स्नेह राणाने स्लिपमध्ये झेल सोडला, तर त्यानंतर यष्टिरक्षक यास्तिका भाटियाकडूनही झेल सुटला. या संधीचा फायदा घेत अॅक्लस्टनने काही आकर्षक फटके खेळत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, हिंदुस्थानच्या फिरकी माऱ्यासमोर तिची झुंज अखेर निष्फळ ठरली. इंग्लंडकडून एमी जोन्स (54) आणि सोफी अॅक्लस्टन (50) यांनीच अर्धशतके झळकवत हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही प्रमाणात प्रतिकार केला. दीप्ती शर्माने इझी वाँगला त्रिफळाचीत करत इंग्लंडला नववा धक्का दिला. त्यानंतर स्नेह राणाने टप्प्यावर वळण घेणाऱ्या अप्रतिम चेंडूवर एक्लेस्टोनचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा डाव 186 धावांत संपुष्टात आणला.

संक्षिप्त धावफलक  हिंदुस्थानी महिला (पहिला डाव) ः 285 (स्मृती मानधना 83 ; सोफी अॅक्लस्टन 3/68) (दुसरा डाव) ः 7 बाद 341 घोषित (यास्तिका भाटिया 113, स्मृती मानधना 70; सोफी अॅक्लस्टन 5/118) विजयी वि. इंग्लंड महिला (पहिला डाव) ः 170 (एमी जोन्स 52; क्रांती गौड 5/37). (दुसरा डाव) ः 176 धावा (एमी जोन्स 54, ; स्नेह राणा 4/42).

ऐतिहासिक वर्चस्व

या विजयासह महिला कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी महिलांनी इंग्लंडविरुद्ध चौथा विजय मिळवला. इंग्लंडच्या भूमीवरील दहा कसोटी सामन्यांपैकी हिंदुस्थानचा हा तिसरा विजय असून, उर्वरित सात सामने अनिर्णित राहिले आहेत. यास्तिका भाटियाने दुसऱ्या डावात शानदार (113 धावा) शतक झळकवले. स्मृती मानधनाने दोन्ही डावांत अनुक्रमे 83 आणि 70 धावांची दमदार खेळी केली, तर पहिल्या डावात क्रांती गौडने 5 बळी घेत इंग्लंडची पंबर मोडली. निर्णायक डावात स्नेह राणाने 4 बळी घेत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तोच दिवस…24 वर्षांनी रचला इतिहास

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने 2002मध्ये इंग्लंडला लॉर्ड्स मैदानातच पराभूत करत नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर तोच दिवस, तोच महिना हिंदुस्थानसाठी सुवर्णकाळ घेऊन उजाडला. कारण सोमवारी 13 जुलैलाच हिंदुस्थानच्या महिला संघाने इंग्लंडला एकमेव कसोटी सामन्यात पराभव करत इतिहास रचला.