
जुलैच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यानंतर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे आठवडाभरापासून पाऊस गायब झाला आहे. मात्र, आठवडाभरानंतर ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याने २० जुलैनंतर मुंबईसह राज्यभरात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे या वर्षी पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज याआधीच हवामान खात्याकडून देण्यात आला होता. जूनमध्ये कोकणासह काही जिल्ह्यांत हजेरी लावून गेलेला पाऊस अनेक दिवस गायब होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने सारी कसर भरून काढत राज्याला झोडपून काढले होते. गेल्या आठवडाभरापासून पाऊस पुन्हा गायब झाला आहे, मात्र आता हवामानात बदल होण्यास सुरुवात झाल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, मात्र यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी जाणार असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासन म्हणते…
आठवडाभर मान्सूनचा वेग मंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाची तूट भरून काढेल.
पावसाच्या अंदाजानुसारच पेरण्या करा
-
जुलैच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये अद्याप शेतीसाठी पूरक पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही भागांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
-
त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या नियोजनासाठी ‘मेघदूत ॲप’ वापरून पावसाच्या अंदाजानुसार काम करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. समाधानकारक पावसाचा अंदाज असेल तरच पेरण्या करा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






























































