
राज्यात ख्रिश्चन विवाह निबंधक (रजिस्ट्रार) नसल्याने ख्रिस्ती बांधवांचे विवाह आणि त्यासंदर्भातील कामे खोळंबली आहेत. सरकारने तातडीने ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या अंदाजे 12 लाख असून या समाजाचे लोक प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिह्यातील वसई भागात वास्तव्यास आहेत. पूर्वी ख्रिश्चन विवाह निबंधक हे मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी असत. परंतु सध्या मंत्रालयात कोणताही ख्रिश्चन राजपत्रित अधिकारी उपलब्ध नाही. यापूर्वी हे काम पुणे जिह्यातील एका तहसीलदाराद्वारे पाहिले जात असे. ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करून या समाजाचा प्रश्न सोडवावा, असे खासदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.




























































