
अभिनेता शाहरुख खान याच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी शाहरुखच्या वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’ बंगल्यावरील नूतनीकरणाच्या कामाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेनुसार या कामात बांधकाम आणि पर्यावरणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन होत असून शाहरुख आपल्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘मन्नत’ हा बंगला हेरिटेज म्हणून नोंदणीकृत आहे. त्यामुळे या बंगल्यात कोणतेही संरचनात्मक बदल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी घेणे बंधनकारक असते. याचिकेत ‘मन्नत’साठी मिळालेल्या सीआरझेड मंजुरीलाही आव्हान देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार देत याचिका फेटाळली.































































