
मिटमिटा येथील गुन्हे शाखेच्या धाडीने दिवंगत कामगार नेते बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसमध्ये कोट्यवधीची मालमत्ता तसेच हत्यारांचा साठा सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी शीला बाबा फर्जन दोरडी या महिलेला अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज तिला न्यायालयात हजर केले असता तिची हर्सल कारागृहात रवानगी करण्यात आली. तसेच फर्जन यांचा मुलगा फिरदौस व त्यांच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली.
छावणी पोलिसांनी आज मंगळवारी बाबा फर्जन यांचा भाऊ आणि बहीण या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. भाऊ आणि बहिणीच्या वतीने बाबा फर्जन यांची भाची हजर झाली होती. तिने बाबा फर्जनकडे असलेल्या पैशांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे सांगितले. तर बाबा फर्जन यांचा मुलगा फिरदौस फर्जन याने मात्र, शीला फर्जन ही दुसरी बायको नसून ती केवळ केअरटेकर असल्याचे सांगितले. मात्र, वडिलांच्या निधनाची माहिती नातेवाईकांनी दिली नव्हती, इतरांकडून आम्हाला कळाले. ही माहिती लपविण्यामागे नातेवाईकांचा काय हेतू होता हे काही समजले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही दोघे भाऊ आणि आई हे वारसदार आहोत. त्यांच्या संपत्तीसाठी आपण न्यायालयात दावा ठोकणार असल्याचे फिरदौस याने सांगितले.




























































