राम मंदिराच्या CEO पदासाठी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची झुंबड, एक हजारहून अधिक अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या येथील राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पदासाठी आतापर्यंत १ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, अर्जदारांमध्ये निवृत्त सनदी अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच निवड समितीच्या अधिकृत ई-मेलवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १८ जुलै असून, त्यापूर्वी अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राम मंदिरातील देणगी घोटाळ्यानंतर मंदिर ट्रस्टच्या दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तीन सदस्यीय निवड समिती स्थापन केली आहे.

निवड समितीतील एका सदस्याने सांगितले की, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी काही तासांत सुमारे ७५० अर्ज प्राप्त झाले. २४ तासांच्या आत हा आकडा एक हजारांवर पोहोचला असून, अंतिम मुदतीपर्यंत अर्जांची संख्या अनेक हजारांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे पात्रतेच्या निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यासाठी समितीने स्वतंत्र सचिव नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

या सचिवपदासाठी निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. हा सचिव सर्व अर्जांचे संकलन, वर्गीकरण आणि प्राथमिक छाननी करून निवड समितीसमोर सादर करणार आहे.

निवड समितीची १९ जुलै रोजी बैठक होणार असून, त्यामध्ये अर्जांची छाननी सुरू केली जाईल. तसेच मुलाखतींचे वेळापत्रकही निश्चित केले जाणार आहे.

दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अमिताभ ठाकूर (५८) यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज केल्याची माहिती सार्वजनिकपणे दिली आहे. ट्रस्टने निश्चित केलेल्या पात्रतेच्या निकषांनुसार आपण या पदासाठी पात्र असल्याने अर्ज सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

अमिताभ ठाकूर यांचे नाव यापूर्वीही विविध वादांमुळे चर्चेत आले होते. गेल्या वर्षी १९९९ मध्ये देवरिया जिल्ह्यात औद्योगिक भूखंड मिळवून देण्याच्या कथित फसवणूक प्रकरणात लखनऊ पोलिसांनी त्यांना अटक केली होती.