साखरपुडा मोडल्याच्या रागातून होणाऱ्या पत्नीवर हल्ला, मुलीला वाचवताना आईचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखरपुडा मोडल्याच्या रागातून तरुणाने होणाऱ्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीला वाचवताना आईचा मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. युवराज असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय युवराजचे 21 वर्षीय वर्षासोबत साखरपुडा झाला होता. मात्र आरोपी आणि पीडितेच्या वयातील अंतरामुळे हा साखरपुडा मोडल्याची माहिती मिळते. साखरपुडा मोडल्याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. मुलीला वाचवायला आलेल्या पीडितेच्या आईचीही आरोपीने हत्या केली.

युवराज हा वर्षाचा नातेवाईक होता आणि तिने युवराजशी लग्न करण्यास नकार दिला होता, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, परंतु नंतर वयातील अंतराचे कारण देत तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी युवराजशी संपर्क तोडला होता. यामुळे नैराश्येतून युवराजने वर्षावर हल्ला केला, असे विरुधुनगरचे पोलीस अधीक्षक गौतम गोयल यांनी सांगितले.