कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी नवी खूशखबर; 48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ, लवकरच दिवसा मोफत वीजपुरवठा , मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जमाफीनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवी खूशखबर आहे. शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्यात येणार असून लवकरच त्यांना दिवसा विनामूल्य वीज पुरवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली.

शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकऱयांची पाटी कोरी झाली पाहिजे असे सांगत फडणवीस यांनी, साडेसात हॉर्सपॉवर क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याचे सांगितले.

साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषिपंपांचे सध्याचे वीज बिल सरकारने आधीच माफ केले आहे, मात्र शेतकऱयांच्या नावावर जुनी बिले थकीत होती. त्यामुळे नवीन कनेक्शन घेताना आणि इतर कामांत अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी जुनी वीज बिल माफी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीसाठी राज्य सरकार दरवर्षी अर्थसंकल्पातून 25 हजार कोटी रुपये वीज वितरण पंपनीला देत असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षअखेरपर्यंत 100 टक्के शेतकऱयांना दिवसा वीज

सध्या राज्यातील 76 टक्के शेतकऱयांना दिवसा वीज दिली जात आहे. वर्षअखेरपर्यंत 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दिवसाच्या वेळी आठ ते दहा तास पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाईल, असे ते म्हणाले.