
पावसाळ्यात पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कंबर कसली आहे. प्राधिकरणाकडून प्रकल्प स्थळांवर वॉच ठेवला जात असून यासाठी संबंधित विभागातील अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना प्रकल्पस्थळी पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रकल्पस्थळी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात दोन हजारांहून अधिक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे परिसरात पाणी भरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्याची दखल घेत एसआरएचे मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विकासकांना देण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले आहे.































































