
श्रीरामपूर शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूरात सर्वपक्षीय पक्ष, व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विराट निषेध महामोर्चा काढण्यात आला. हनुमान मंदिर येथून सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात शहरासह तालुक्यातील विविध भागांतील सुमारे पाच हजार नागरिक सहभागी झाल्याने शहरातील जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येने श्रीरामपूरच्या जनतेचा संयम अखेर संपला आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक खुनाच्या घटनेने नागरिक संतापाने पेटून उठले असून, मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, अशी आर्त हाक मयत आकाश दुबय्या यांचे वडील शेखर दुबय्या यांनी सरकारला घातली.
गेल्या चार दिवसांपासून श्रीरामपूरकरांनी शहरात कडकडीत बंद पाळत न्यायासाठी लढा सुरू ठेवला आहे. व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, महिला, युवक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या महामोर्चामुळे संपूर्ण श्रीरामपूर घोषणांनी दणाणून गेले. `आकाश दुबय्या यांना न्याय मिळालाच पाहिजे’, `मुख्य सूत्रधारांना तत्काळ अटक करा’, `मकोका लागू करा’, `गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा’, `श्रीरामपूर गुन्हेगारी मुक्त करा’, अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असली, तरी या संपूर्ण कटामागील मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याचा आरोप मोर्चेकर्यांनी केला. केवळ काही आरोपींना पकडून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला, तर तो जनतेला मान्य होणार नाही. या हत्येमागील प्रत्येक सूत्रधार, आर्थिक मदत करणारे, कट रचणारे आणि गुन्ह्याला संरक्षण देणारे सर्वजण कायद्याच्या कचाट्यात आले पाहिजेत, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.
महामोर्चादरम्यान अनेक वक्त्यांनी श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवर जोरदार टीका केली. शहरात गुन्हेगारांची दहशत वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक भयाच्या छायेत जगत आहेत. कायद्याचा धाक उरलेला नाही. प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली नाही, तर भविष्यात आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला. मोर्चाच्या शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वडिलांचा आक्रोश; बेग गँगवर आरोप
हत्या झालेल्या आकाश दुबय्या यांच्या वडिलांनी आपल्या मनातील आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. तीन दिवस बंद पाळूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस एॅक्शन होत नाही. श्रीरामपूरमधील बेग आणि जधे या दोघांनी मिळून माझ्या मुलाला मारले आहे. यांचा `एन्काउंटर’ झाला पाहिजे. फाशी झाली पाहिजे. वडिलांसमोर मुलाची हत्या झाली आहे, माझी काय भावना असेल. कोणाच्यात दम नसेल, तर मला हत्यार द्या. मी यांचा `एन्काउंटर’ करतो. मला फाशी द्या. मला न्याय द्या, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

































































