राम मंदिर देणगी चोरी प्रकरण – SIT चा अंतिम अहवाल लवकरच येणार, मोठी नावं समोर येण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अंतिम अहवाल लवकरच शासनाकडे सादर होण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत हा अहवाल समोर येण्याची शक्यता असून या अहवालामध्ये अनेक बड्या व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे. एसआयटीच्या प्राथमिक अहवालामध्ये कोणावरही थेट ठपका ठेवण्यात आला नसला, तरी अंतिम अहवालामध्ये देणगी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे समोर येणे निश्चित मानले जात आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या भूमिका तपासण्यात आल्याचे समजते आहे. सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान‘ वेब पोर्टलने ही बातमी दिली आहे. या वृत्तामध्ये कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर एसआटीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात अविनाश शुक्ला आणि मनीष यादव हे नोटांचे बंडल चोरायचे आणि इतर आरोपी त्यांना मदत करायचे हे स्पष्ट झाले होते. दानपेटीच्या चाव्या रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव याच्याकडे असायच्या. टिन्नू यादव हा चंपत राय यांच्या जवळचा मानला जातो. तसेच नोटा मोजणीचे प्रभारी आणि निवृत्त बँक कर्मचारी सुभाष श्रीवास्तव यांनीही आपल्या जबाबदारीचे पालन केले नसल्याचे तपासात समोर आल्याचे कळते.

दरम्यान, 6 जुलैला झालेल्या बैठीनंतर चंपत राय यांनी एसआयटीला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. नोटा मोजणीच्या एसओपीवर माझी स्वाक्षरी नाही. मला या एसओपीबद्दल 13 जून 2026 रोजी चोरीचा खुलासा झाल्यावरच माहिती मिळाली, असा दावा करत चंपत राय यांनी सर्व जबाबदारी विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर ढकलल्याचे कळते. या एसओपीवर डॉ. अनिल मिश्रा आणि बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक योगेंद्र मिश्रा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे अंतिम अहवालात डॉ. अनिल मिश्रा आणि बँकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

गोविंददेव गिरी यांचीही भूमिका स्पष्ट होणार

तपास पथकाने कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या आर्थिक व्यवस्थापनातील भूमिकेचीही पडताळणी केली आहे. कोषात पैसे जमा होईपर्यंतची जबाबदारी माझी नाही. कोषात आलेला निधी सुरक्षित असून तो योग्य ठिकाणी वापरला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. नियमानुसार एसओपीवर अध्यक्ष, सरचिटणीस किंवा कोषाध्यक्ष यांपैकी दोघांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात, परंतु चंपत राय आणि कोषाध्यक्षांऐवजी डॉ. अनिल मिश्रा स्वाक्षऱ्या करत असल्याचे समोर आले आहे.

अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष

हिंदू धर्मसेनेचे अध्यक्ष संतोष दुबे यांनी केलेले आरोप आणि सोशल मीडियावरील दाव्यांचीही एसआयटीने चौकशी केली असून बहुतांश आरोप तथ्यहीन आढळले आहेत. आता सर्वांचे लक्ष शनिवारकडे लागले असून एसआयटीच्या अंतिम अहवालानंतर अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या प्रशासकीय रचनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.