
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे येत्या 17 जुलैला पेपरफुटीविरोधात उत्तराखंडमधील डेहरादून येथे जाणार आहेत. उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोग (Uttarakhand Subordinate Service Selection Commission) या परिक्षेत सुरू असलेल्या घोटाळ्यांविरोधात ते आवाज उठवणार आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून याबाबत एक पोस्ट शेअर करत सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केले आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला आहे.
”17 जुलैला मी डेहरादूनला येत आहे. पण उत्तराखंडच का? कारण देवभूमीला पेपर फुटीचे केंद्र बनवण्यात आले आहे. UKSSSC परीक्षेत इथे एक अशी ‘सिस्टीम’ तयार झाली आहे, जिथे पटवारी, लेखपाल किंवा इतर कोणतेही पद गुणवत्तेवर नाही, तर गुन्हेगारांनी ठरवलेल्या दरांवर मिळते. सरकारने कडक कॉपी-विरोधी कायदा केला तरीही पेपर फुटतच राहिले. कायदा कागदावरच राहिला आणि पेपर बाजारात विकले जात राहिले. जरा विचार करा, एका मुलाने वर्षानुवर्षे तयारी केली. फॉर्म भरला, फी दिली, दूरवरच्या सेंटरपर्यंत गेला आणि त्याचे पद मात्र दुसऱ्याच कोणीतरी विकत घेतले. हा केवळ पेपर लीक नाही – ही चोरी आहे. त्या तरुणाच्या हक्काची, त्याच्या रोजगाराची, त्याच्या भविष्याची”, अशी टीका राहुल गांधी यांनी या पोस्टमधून केली आहे.
या पोस्टमधूनच राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांना 17 जुलै रोजी आयोजित लढ्यात सामिल होण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या पोस्टसोबत एक सह्यांचे कॅम्पेन देखील राबवले आहे. ” या, ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ अधिक बुलंद करूया. भविष्य लिलावात काढू देणार नाही. स्वप्ने लीक होऊ देणार नाही”, असे देखील म्हटले आहे.



























































