Vasai News – अर्नाळा समुद्रात चार अल्पवयीन मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरारच्या अर्नाळा समुद्रात गुरुवारी सकाळी चार अल्पवयीन मुले बुडाली. पोलीस आणि होमगार्डच्या जवानांनी दोघांना वाचवले असून अन्य दोघांचा शोध सुरु आहेत. सर्व मुले 14 ते 17 वयोगटातील असून नालासोपारा पश्चिमेतील रहिवासी आहेत. जीवरक्षक, स्थानिक बचाव पथके, अग्निशमन दल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता दोन्ही मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास ही चारही मुले समुद्रात उतरली होती. किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदार, पुरुष होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांनी त्यांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देत हटकले होते. मात्र, गस्त पथक पुढे निघून गेल्यानंतर ही मुले पुन्हा समुद्रात उतरली.

काही वेळातच समुद्राच्या लाटांमध्ये अडकून मुलांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकताच पोलीस व होमगार्ड जवानांनी घटनास्थळी धाव घेत समुद्रात उड्या मारल्या. त्यांनी दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, उर्वरित दोघे समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये बेपत्ता झाली.

विशेष म्हणजे, 30 सप्टेंबरपर्यंत अर्नाळा समुद्रकिनारी समुद्रात उतरण्यास पोलिसांकडून बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतचे इशारे देणारे फलकही समुद्रकिनारी लावण्यात आले आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शोएब खान आणि आयन झाकीर मंडल अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत.