
महाराष्ट्र शासन आरोग्य सुविधांच्या मोठ्या जाहिराती आणि घोषणा करत असले, तरी राजापूरच्या पूर्व भागातील ग्रामीण रुग्णालय रायपाटणची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. अर्धशतकापूर्वी गावचे सुपुत्र स्वर्गीय हनुमंत गणेश कुलकर्णी यांनी भूदान करून आणि लोकवर्गणीतून या आरोग्य केंद्राची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र, आज याच रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे.
रुग्णालय आवारातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून इमारतीचे छप्पर गळत असल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर कधी कौले पडतील, याची शाश्वती राहिलेली नाही. येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सुमारे २० ते २२ खोल्यांची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. कोविड-१९ काळात उभारण्यात आलेले ऑक्सिजन निर्मिती केंद्र आज केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहे. या दुरवस्थेमुळे येथील रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते, ज्यामुळे विशेषतः महिला रुग्णांची मोठी कुचंबणा होत आहे.
या इमारतीचे मूळ बांधकाम अभियंता स्वर्गीय सिताराम वामन प्रभु देसाई यांनी केले होते. देणगीदारांच्या भावनेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार न करता प्रशासनाने या रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले आहे. या परिस्थितीचा तीव्र शब्दांत निषेध करत, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आता जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा रायपाटण गावचे माजी सरपंच विलास गांगण यांनी दिला आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयाचा कायापालट करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



























































