
बदल्या हवामान, अनियमित मान्सून आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील भातशेती अनेक आव्हानांना सामोरी जात असली, तरी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांच्या साहाय्याने उत्पादनक्षमतेत विक्रमी वाढ साधली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र कमी होत असले तरी हेक्टरी उत्पादनात झालेली वाढ ही कोकणच्या बळीराजासाठी आशादायी ठरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून, खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कोरोनापूर्वी जिल्ह्यात 65 ते 68 हजार हेक्टरवर भात लागवड होत होती. कोरोनाकाळात रोजगारासाठी गावी परतलेल्या नागरिकांमुळे हे क्षेत्र वाढले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पुन्हा भात लागवडीचे क्षेत्र घटले आहे. भात क्षेत्र कमी होण्यामागे बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि फळबाग लागवडीकडे वाढलेला कल ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. शासनाकडून फळबागांसाठी मिळणाऱ्या अनुदानामुळे अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीऐजी आंबा, काजू आणि इतर फळबागांची लागवड सुरू केली आहे. मात्र, सुधारित आणि संकरित भात वाणांच्या वापरामुळे उत्पादनक्षमतेत मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात हेक्टरी सरासरी 2,591.90 किलो उत्पादन मिळत असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेही त्यात भर पडत आहे.
यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रानंतर पाऊस सुरू झाला; मात्र त्यातील खंडामुळे पेरणीवर परिणाम झाला. पेरणीनंतर पाऊस थांबल्याने अनेक ठिकाणी रोपे नीट उगवली नाहीत. काही शेतकऱ्यांना रोपवाटिकांना कृत्रिमरीत्या पाणी द्यावे लागले. तर काही भागात अतिवृष्टीमुळे भात खाचरांत पाणी साचल्याने चिखलणी आणि लागवडीची कामे रखडली आहेत. भात पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात पडणारा अनियमित पाऊस किडरोगांना निमंत्रण देतो, तर कापणीच्या वेळी होणारा परतीचा पाऊस हातात आलेले पीकही हिरावून घेत असल्याने अनेक शेतकरी भातशेतीपासून दूर जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 909.94 मिमी पावसाची नोंद झाली असून, हा वार्षिक सरासरीच्या 27.5 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 953.67 मिमी पाऊस झाला होता. पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी त्याचे अनिश्चित वेळापत्रक हेच कोकणातील भातशेतीपुढील सर्वात मोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे.
बियाणे, खते वेळेवर उपलब्ध
दरम्यान, कृषि विभागाने यंदाच्या हंगामासाठी 6 हजार क्विटल भात बियाण्यांचा साठा मे महिन्यातच उपलब्ध करून दिला होता. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या खतांपैकी आतापर्यंत 9 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित खतही लवकरच उपलब्ध होणार, असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.































































