
आषाढी यात्रेदरम्यान विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी १५ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्याच दिवशी प्रश्नचिन्हाखाली आल्याचे चित्र दिसून आले आहे. व्हीआयपी दर्शन बंदीच्या पहिल्याच दिवशी काही मान्यवरांना विशेष दर्शन दिल्याचा आरोप होत आहे.
यंदाच्या आषाढी यात्रेत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना कमीत कमी वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शनास बंदी घालत कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला होता.
बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सहकुटुंब विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. व्हीआयपी दर्शन बंद असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे वेगळे चित्र समोर आले.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पंढरपुरात आल्यानंतर त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून थेट मंदिरात नेऊन विशेष दर्शन देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेनंतर सर्वसामान्य भाविकांमधून नाराजी व्यक्त होत असून, एकाच नियमाची वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी अंमलबजावणी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हीआयपी दर्शन बंदीचा निर्णय सर्वांसाठी समान असावा आणि त्यात कोणालाही अपवाद नसावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन नेमके कोणी केले, कोणाच्या निर्देशानुसार विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.






























































