धक्कादायक! व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून शिक्षकाने 2 मुलांसह जीवन संपवलं; आमदुरा घाटावर गोदावरी नदीपात्रात कार घातली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन निष्पाप मुलांसह कार गोदावरी नदीत घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवून आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.

सुनील मोरे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते. सध्या ते हिमायतनगर येथील पोटा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मुदखेड तालुक्यातील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटावरून त्यांनी आपली कार थेट गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने घालून हे टोकाचे पाऊल उचलले. या भीषण घटनेत सुनील मोरे यांच्यासह त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमित या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमध्ये त्यांनी हदगावचे गटशिक्षणाधिकारीआणि केंद्रप्रमुख यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. ‘एसडीआरएफ’ (SDRF) च्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रातून कार आणि त्यामधील तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.