धावत्या बसने पेट घेतला अन् 47 भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला; जम्मू-श्रीनगर हायवेवर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ दर्शन घेऊन राजस्थानला परतणाऱ्या भाविकांच्या बसला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. रामबन जिल्ह्यातील करोल भागाजवळ ही घटना घडली. सुदैवाने, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे बसमधील सर्व 47 प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, या आगीत प्रवाशांचे सर्व सामान आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. राजस्थानचे भाविक दक्षिण काश्मीर हिमालयातील पवित्र अमरनाथ गुहेचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. करोल येथे तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना या बसमधून धूर निघत असल्याचे दिसले. जवानांनी तात्काळ बस थांबवून युद्धपातळीवर प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, एसडीआरएफ, अग्निशामक दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही, अशी माहिती रामबन पोलीस नियंत्रण कक्षाने दिली. मात्र, आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान अग्निशामक दलाचा एक जवान खाली पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याला तात्काळ जम्मू येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रामबनचे उपायुक्त मोहम्मद अलियास खान आणि एसएसपी अरुण गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने सर्व प्रवाशांना प्रथम रामबन येथील अमरनाथ यात्रा कॅम्पमध्ये सुरक्षित हलवले. सर्व यात्रेकरू सुरक्षित असून त्यांना लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांच्यासाठी राजस्थानपर्यंत थेट विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच प्रवासादरम्यान लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा आणि अन्नपदार्थ पुरवण्यात आले आहेत, अशी माहिती रामबनचे उपायुक्त मोहम्मद अलियास खान यांनी दिली.

तपास सुरू 

बसला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि रामबनच्या जिल्हा फॉरेन्सिक मोबाईल युनिटने घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.