
चेंबूर पूर्व येथील मुकुंद नगर परिसरात शुक्रवारी केमिकल टँकरचा भीषण स्फोट झाला. स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. स्फोटाची तीव्रता एवढी तीव्र होती की, आजूबाजूच्या गाड्यांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
चेंबूरमधील जिजामाता नगर परिसरातील मैसूर कॉलनीजवळ सायंकाळी ५च्या सुमारास ही घटना घडली. टँकरच्या टाकीचे वेल्डिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला. या भीषण स्फोटाने टँकरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहम्मद अक्रम (१९) याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर मोहम्मद फैय्याज (४८) याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. स्फोटाचे नेमके कारण समजलेले नाही. टँकर रिकामा होता की त्यात काही रसायन शिल्लक होते का? टँकरच्या दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती की नाही यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




























































