
उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील मुख्याध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. सुरवातीला मुख्याध्यापकाचा सर्पदंशामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासाअंती हा नैसर्गिक हत्या नसून पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आले आहे. मयत मुख्याध्यापकाच्या पत्नीचे तिच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच तिने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला. अतुल असे मयत मुख्याध्यापकाचे तर दामिनी असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दामिनीने प्रथम अतुलला झोपेच्या गोळ्या घालून दूध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिचा प्रियकर ड्रायव्हर आणि त्याच्या दोन साथीदारांनी एक विषारी साप पलंगावर सोडला. त्या सापाने झोपलेल्या अतुलला अनेक वेळा दंश केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी ही एक नैसर्गिक घटना असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र अतुलच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासून पत्नीवर संशय होता.
तांत्रिक पुरावे, चौकशी आणि इतर पुराव्यांमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर ड्रायव्हर आणि इतर दोन आरोपींविरोधात खून आणि गुन्हेगारी कट यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच अतुलकडे 20 लाख रुपयांचे विमा संरक्षण होते. आरोपींनी सहकार्य करणाऱ्या सोनू आणि उदय यांना विम्याची रक्कम मिळाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे वचन दिले होते, असेही पोलीस तपासात उघड झाले आहे.

























































