विरोधी बाकांनंतर आता ‘गद्दार बाक’, तृणमूलचे खासदार महुआ मोईत्रांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेतील आसनव्यवस्था आणि बंडखोर खासदारांना अधिकृत बैठकीत सहभागी करून घेतल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेत आता ‘ट्रेझरी बेंच’ आणि ‘विरोधी बाकां’नंतर ‘गद्दार बाक’ अशी नवी श्रेणी तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महुआ मोईत्रा म्हणाल्या की, सर्वपक्षीय बैठकीत 20 बंडखोर खासदारांना सहभागी करून घेतल्याच्या निषेधार्थ संयुक्त विरोधकांनी सभात्याग केला. या 20 खासदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असून, त्यांनी एनसीपीआय (NCPI) या अद्याप सभापतींकडून मान्यता न मिळालेल्या गटात प्रवेश केल्याचा दावा केला आहे. या गटाच्या विलीनीकरणाला अद्याप लोकसभा अध्यक्षांची मंजुरी मिळालेली नसतानाही या खासदारांना सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण देण्यात आले.

महुआ मोईत्रा म्हणाल्या, “काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या 20 बंडखोर खासदारांना बोलावण्यात आले. त्यांच्या अपात्रतेच्या याचिका अद्याप प्रलंबित आहेत. त्यांनी ज्या एनसीपीआय गटात प्रवेश केल्याचा दावा केला आहे, त्या विलीनीकरणालाही सभापतींची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे संयुक्त विरोधकांनी निषेध म्हणून बैठकीतून सभात्याग केला.”

त्यांनी पुढे आरोप केला की, या खासदारांना सामावून घेण्यासाठी संसदेतील पारंपरिक आसनव्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. “पूर्वी संसदेत ट्रेझरी बेंच आणि विरोधी बाक अशीच व्यवस्था होती. मात्र आता सरकारने तिसरी श्रेणी तयार केली आहे, ती म्हणजे ‘गद्दार बाक’,” असा टोला त्यांनी लगावला.

मोईत्रा यांनी पुढे सांगितले की, “सुदीप बंदोपाध्याय हे ‘गद्दार बाकां’चे नेते म्हणून पुढील रांगेत बसणार आहेत. संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील हा एक वेगळाच दिवस आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली.