विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबद्दल पंतप्रधान मोदींनी साधी माफीही मागितली नाही, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फक्त शिक्षण व्यवस्थेबद्दल नव्हे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याचीही चिंता आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबद्दल पंतप्रधान मोदींनी साधी माफीही मागितली नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

संसदेच्या आवारात राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, “आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करायची आहे. मात्र लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे संसदेत चर्चेसाठीही सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे ते उघडपणे सांगत आहेत.”

ते म्हणाले, “हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि देशातील तरुणांच्या भवितव्याचा आहे. विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे, त्यांना लाठ्यांनी बेदम मारले जात आहे. ही अत्यंत चुकीची आणि भारतीय संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. काल जे घडले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधी माफीही मागितलेली नाही.”

राहुल गांधी म्हणाले, “देशातील तरुण शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेविरोधात आंदोलन करत आहेत. संपूर्ण देशाला माहिती आहे की शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ही व्यवस्था आतून पोखरली गेली आहे. आम्ही अनेक वेळा याबाबत बोललो आहोत. मी स्वतः अनेक सादरीकरणांद्वारे हा मुद्दा मांडला आहे. मग पंतप्रधान यावर मौन का बाळगत आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण करण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत.”

राहुल गांधी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई केल्याचे सांगितले. “सरकार विद्यार्थी आणि शिक्षकांविषयी संवेदनशील आहे. या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले, “प्रश्न अटक करण्याचा नाही. देशातील तरुणांशी अशी वागणूक देणे चुकीचे आहे. आज देशातील तरुणांसमोर संधीच उरलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी फक्त स्पर्धा परीक्षांचे एकच दार खुले होते आणि तेही उद्ध्वस्त झाले आहे.”

ते पुढे म्हणाले, “हे विद्यार्थी केवळ शिक्षण व्यवस्थेविरोधात आवाज उठवत नाहीत, तर ते त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अदानी-अंबानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्षण व्यवस्थेवरील प्रभाव आणि विद्यापीठांमध्ये प्रचारकांना कुलगुरू बनवले जात असल्यामुळे आमच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे हा केवळ शिक्षणाचा प्रश्न नाही, तर देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.”

राहुल गांधी म्हणाले, “एका बाजूला हजारो कोटी रुपये खर्च करून मोठे समारंभ होताना तरुण पाहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांना आपले भविष्य अंधारात दिसत आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलन योग्य आहे. सरकारने त्यांना मारहाण करण्याऐवजी शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.”

जखमी विद्यार्थ्यांची भेट घेणार का, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले, “हो, मी निश्चितच जखमी विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे.”

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा का, असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र विद्यार्थ्यांना मारहाण शिक्षणमंत्र्यांनी केलेली नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यायला हवा. गृहमंत्री पंतप्रधानांना जबाबदार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.