
कश्मीरमधील अनंतनाग जिह्यातील लाल चौक परिसरात बुधवारी दहशतवाद्याने हल्ला केला. दहशतवाद्याने अंदाधुंद केलेल्या गोळीबारात एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना ’द रेजिस्टेंस फ्रंट’ (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दहशतवाद्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अचानक गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही दहशतवादाच्या गोळीबाराला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन (वय 35) हे जखमी झाले. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुरेशी हे ‘इंडिया रिझर्व्ह’च्या तिसऱ्या बटालियनमध्ये कार्यरत होते. हुसैन यांचा मृतदेह गावी आणताच त्यांचा पार्थिव पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर खऱ्या अर्थाने या खोऱ्यात घडलेली ही पहिलीच मोठी दहशतवादी घटना आहे.
अनंतनाग येथील लाल चौकाजवळ पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळीबार केला आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि हल्लेखोराचा माग काढण्यासाठी व्यापक शोध आणि दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा कुमक पाठवण्यात आली असून, मुख्य मार्गांवर तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. हल्लेखोराची ओळख पटवून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक मजबूत केली असून, संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागील हेतूचा तपास सुरू आहे. गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे, ज्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.


























































