
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि शेतीसाठी आवश्यक वीजजोडणी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या ज्ञानेश्वर मालेकर (62) यांनी बुधवारी पहाटे सुमारे 5 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या पाच एकर शेतीसाठी लाखो रुपये खर्च करून बोअरवेल खोदली होती. सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून वीजजोडणीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करत डिमांडची रक्कमही भरली होती. मात्र, दीर्घकाळ उलटूनही वीजजोडणी मिळाली नाही. दुसरीकडे सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचना यामुळे त्यांची मानसिक अवस्था खालावत गेली. अखेर या असह्य तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील दोन्ही मुलांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या दुहेरी आघातातून कुटुंब अजून सावरले नव्हते. आता वडिलांनीही आत्महत्या केल्याने मालेकर कुटुंबावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर मालेकर यांच्या पश्चात पत्नी आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच प्रलंबित वीजजोडण्या आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे कृषी व्यवस्थेतील गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, सिंचनाचा अभाव, प्रलंबित वीजजोडण्या आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



























































