
देशभरात गाजलेल्या मेघालय हनिमून हत्याकांड प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने विभक्त कुटुंबपद्धती, जीवनात गॅजेट्सचा वाढता हस्तक्षेप आणि तरुणांमधील नैराश्य यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संसार मोडण्याचं प्रमाण वाढलंय, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. दरम्यान, मेघालय हनिमून हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच तीन आठवड्यांच्या आत तिला आत्मसमर्पण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील समस्यांचे निवारण घरातील वडीलधारी मंडळी करत असत. मात्र, विभक्त कुटुंब पद्धतीत पती-पत्नी एकटेच असता. यामुळे विभक्त होण्याचे नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे. सोशल मीडियामुळे जगाशी संपर्क वाढला असला, तरी आजची तरुण पिढी मानसिक तणावाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनली आहे. याचा परिणाम अनेकदा त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध व कौटुंबिक जीवनावर होताना दिसतो, असे निरीक्षण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नोंदवले.
बदलत्या समाजात या गोष्टी अपरिहार्य आहेत. आजची पिढी आपल्या पिढीपेक्षा अधिक ज्ञानी असू शकते, परंतु समस्या हाताळण्यात ती अधिक संवेदनशील आहे, असे सोनमचा जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले की, त्यांच्याकडे अधिक माहिती आहे, पण ज्ञान नाही. त्यावर न्यायमूर्ती वराळे यांनी प्रत्युत्तर दिले, व्हॉट्सॲपवर जे काही शेअर केले जाते, ते ज्ञान मानले जाते.
आजची पिढी अस्वस्थ आहे. त्यांना समस्यांवर त्वरित उपाय हवे असतात. जर तुम्ही एकत्र कुटुंबाचे सदस्य असाल, तर तुम्ही निराशा दूर करण्यास आणि जुळवून घेण्यास शिकता. विभक्त कुटुंब पद्धतीत, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून रडता. एखादी गोष्ट समजली नाही तर चिडचिड होते. आई-वडील मुलं रडायला लागली तर भावनांऐवजी ते मुलांना गॅजेट्स देतात याचाही उल्लेख सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केला.





























































