
जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदार आज सायंकाळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. सर्व खासदार गांधी स्मृती येथे जाण्यासाठी बसने निघाले. मात्र, पोलिसांनी बसेस आणि बॅरिकेड्स लावून त्यांचा मार्ग आधीच अडवला होता. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आला.
गुरुवारी दुपारनंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार एका बसमधून 30 जानेवारी मार्गावर जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी ही बस थांबवली. त्यानंतर राहुल गांधी व इतर खासदार पायीच गांधी स्मृती येथे पोहोचले. तेथे सर्व खासदारांनी श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू करुन मोदी सरकारचा निषेध केला. आंदोलनात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि सौगता रॉय, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ मांझी, राष्ट्रीय जनता दलाच्या मीसा भारती आणि संजय यादव, सीपीएमचे जॉन ब्रिटास, भाकपचे केपी संतोष कुमार, समाजवादी पक्षाचे रामजीलाल सुमन आदी सहभागी झाले.
तुम्हीच जबाबदार; राहुल गांधी यांचे सडकून उत्तर
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या पोस्टवर सडकून उत्तर दिले आहे. तुम्हीच आपल्या देशातील तरुणांचं भवितव्य सर्वाधिक बरबाद केले आहे. तुम्ही देशाच्या संपूर्ण शिक्षण धोरणावर कब्जा केला. विद्यार्थ्यांचं नुकसान कसे होईल यावर भर दिला आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या सगळ्यांना संरक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करा, अशा तीन मागण्या राहुल गांधी यांनी केल्या आहेत.

























































