लग्नास नकार दिल्याने तरुणीची हत्या करणाऱ्याला २६ वर्षांची जन्मठेप, हायकोर्टाने केले शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नास नकार दिल्याने तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

या हत्येप्रकरणी मला २२ वर्षांची जन्मठेप होणे अपेक्षित आहे. मात्र २०१०च्या नियमावलीनुसार राज्य शासनाने माझी जन्मठेप २६ वर्षांची असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करत या आरोपीने याचिका दाखल केली. न्या. सारंग कोतवाल व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

या याचिकेला राज्य शासनाने विरोध केला. या आरोपीची २६ वर्षांची जन्मठेप योग्यच आहे, असा दावा राज्य शासनाने केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला. क्रूरपणे किंवा जाळून हत्या केली असल्यास आरोपीची जन्मठेप २६ वर्षांची असेल असा ठराव राज्य शासनाने केला आहे. लग्नास नकार दिल्याने या आरोपीने धारधार शस्त्राने वार करून तरुणीची हत्या केली. पीडितेच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे या आरोपीची २६ वर्षांची जन्मठेप योग्यच आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

निर्दयीपणे हत्या
तरुणीच्या शरीरावर तब्बल १३ जखमा होत्या. आरोपीने तरुणीची निर्दयीपणे हत्या केली. अशा गुन्ह्यासाठी २६ वर्षांची जन्मठेप देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.