
पाचशे कोटींची उलाढाल असलेले करंजा बंदर गाळात रुतल्यामुळे येत्या १५ ऑगस्टपासून मासेमारीला जायचे कसे, असा प्रश्न हजारो मच्छीमारांना पडला आहे. सुमारे एक हजार मासेमारी बोटी या बंदरात मासळी घेऊन येतात. मात्र बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने मच्छीमारांना मासळी बोटीतून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची सुमारे पाच ते सात तासांची रखडपट्टी होते. बंदरातील गाळ न काढला गेल्यामुळे यंदा त्याचा मोठा फटका व्यवसायाला बसणार असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
करंजा बंदर हे रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरले आहे. सुमारे २५६ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेले हे बंदर वर्षभरापासून गाळाने भरण्यास सुरुवात झाली आहे. गाळाच्या समस्येमुळे ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरवण्यासाठी येणाऱ्या मच्छीमारांना आणि बंदरातून मासळी उतरवून पुन्हा बाहेर जाण्यासाठी बंदरात बाहेरच पाच ते सात तास वाट पाहावी लागते. यामुळे बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात. बंदरातील गाळाची समस्या अद्यापही कायम असल्याने मासेमारी हंगामातच मासेमारी बोटींना बंदरात ये-जा करण्यासाठी आता ६ ते ८ तासांचा कालावधी लागणार असल्याने मच्छीमारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
करंजा मच्छीमार बंदरातून पावसाळी मासेमारी बंदीचा हंगाम वगळता सुमारे ५०० कोटींची मासळी निर्यात केली जाते. मात्र गाळाच्या समस्येमुळे यंदा निर्यात कमी होण्याची शक्यता आहे.
गाळाची समस्या कायम असल्याने मच्छीमार बोटी बंदरात येण्याचा कालावधी वाढणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, अशी भीती फिशरमेन असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी व्यक्त केली आहे.




























































