संसदेबाहेर एकतर्फी ‘मन की बात’ बंद करा आणि शिक्षणमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्या; मोदींच्या व्हिडीओवर खरगेंची कडाडून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चावर केलेल्या लाठीमारावरून देशातील वातावरण तापलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 दिवसांनी मौन सोडत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. मोदींनी आधी ट्विट केले आणि नंतर एक व्हिडीओ जारी केला. दोषींवर कठोर कारवाईचे आणि नवीन विधेयकाचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना बाहेर एकतर्फी ‘मन की बात’ बंद करा, असा टोला लगावत खरगेंनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीान्याची मागणी लावून धरली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेच्या पटलावर अधिकृत विधान केले पाहिजे. रात्रीच्या वेळी व्हिडीओ रेकॉर्ड करून संसदेबाहेर आपली एकतर्फी ‘मन की बात’ मांडणे योग्य नाही, अशा शब्दांत खरगे यांनी मोदींवर खरपूस टीका केली.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वी सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. आज संसदेत येण्यापूर्वी, धर्मेंद्र प्रधान यांना बरखास्त करा. सर्वात आधी विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी लाठ्या, काठ्या आणि पेलेट गन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. या अटी मान्य झाल्यानंतर सरकारसोबत शिक्षण व्यवस्थेवर सविस्तर चर्चेला तयार आहोत, असे खरगे यांनी ठणकावून सांगितले.

दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मोदींच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. आपले विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत. मध्यरात्री पोस्ट केलेल्या या सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे त्यांच्या समजुतीचा अपमान करू नका, असा टोला लगावत राहुल गांधी यांनी तीन मागण्यांचाही पुनरुल्लेख केला.

1. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तत्काळ हकालपट्टी
2. आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई
3. संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधानांनी देश व विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी