
ज्यांच्या विरोधात उपोषण केले त्यांच्याच हातून अन्न घेऊन उपोषण सोडणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण काय कामाचे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. त्याबद्दल सगळ्यांनाच आनंद आहे. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी आणि इतर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पण मध्यरात्री उपोषण सोडायची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतरवर जिथे त्यांनी उपोषण सुरू केलं होतं तिथेच जर त्यांनी उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. विशेषतः ज्या सरकारविरोधात वांगचुक यांनी आंदोलन केले, त्या सरकारचे दोन मंत्री येतात आणि आपले उपोषण सोडवतात. आंदोलक म्हणून माझी अशी भूमिका आहे की, हे आंदोलन यशस्वी व्हावे म्हणून हुकुमशाहीविरोधी लढे देणाऱ्या अनेक सांस्कृतिक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले होते. त्यांच्यापैकी एखादा प्रतिनिधी तिथे उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजीत दिपके आणि विरोधी पक्षाचे नेते तिथे असायला हवे होते. हे आंदोलन देशाचे होते. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याबाबत संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती, ती मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय उपोषण आणि आंदोलन मागे घेणार नाही ही आमची मागणी होती. त्या मागणीचे काय झाले हे देशाला सांगावे लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जातंय? आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण काय कामाचे? त्याच वांगचुक यांच्या मागणीसाठी लाखो लोक देशभरातून रस्त्यावरून उतरले आणि जंतरमंतर पर्यंत पोहोचले. अमित शहांच्या पोलिसांनी अन्याय आणि अत्याचार केला, डोकी फोडली, हाडं तोडली. या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल. जरी सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं तरी मला असं वाटतं की देशभरातलं आंदोलन शिक्षणपद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन आता थांबणार नाही. मुंबईत आज एक महत्त्वाचं आंदोलन आहे. शिवतीर्थावर आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर संघटना हे राष्ट्रगान आंदोलन करणार आहेत. त्यानंतर रविवारी, माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एक विराट मोर्चा आयोजित केला आहे. मुंबई, महाराष्ट्रात, बिहार, गुजरात देशातल्या प्रत्येक राज्यात आंदोलनं होत आहोत. त्यामुळे वांगचुक यांनी उपोषण सोडलं म्हणून ही आंदोलनं थांबतील या भ्रमात जर सरकार राहणार असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे. यात विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन पावलं उचलायला पाहिजे होती, असे संजय राऊत म्हणाले.
राज्याचे विद्वान मुख्यमंत्री म्हणतात की विरोधी पक्ष चर्चेला घाबरतो. आम्ही चर्चेला का घाबरू? पुलवामापासून ते पहलगामपर्यंत आम्ही चर्चेची मागणी केली तेव्हा तुम्ही चर्चा केली नाही. शेतकरी आत्महत्येबाबत तुम्ही लोकसभेत कधीच चर्चा करत नाहीत. पहिल्या दिवशीपासून या विषयांवर आम्ही चर्चा मागत होतो, तुम्ही यातून पळ काढला. आता सरकारचे लोक आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. या आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचे फंडिंग आहे, भाजपचे नेते वांगचुक यांना चीनचे एजंट म्हणत होते. जेव्हा हे आंदोलन हाताबाहेर जात आहे आणि अमित शहा यांचे दंडुकेही जेव्हा काम करत नाहीत, हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी हे उपोषण संपवण्यासाठी जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना तिथे पाठवलं, असेही संजय राऊत म्हणाले.
ज्यांच्या विरोधात उपोषण केले त्यांच्याच हातून अन्न घेऊन उपोषण सोडणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. वांगचुक यांना जेव्हा उपोषण सोडायचं होतं तर आंदोलनात पोलिसांकडून जखमी झालेल्या आंदोलकाच्या हातून हे उपोषण त्यांनी सोडायला हवं होतं. वांगचुक यांनी उपोषण सोडायचं की नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाहीत. हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी एकाने घ्यायला हवा होता, अशी जनभावना मला दिसतेय. अनेक तरुण तरुणींनी आपलं रक्त तिथे सांडलं, आपली डोकी फोडून घेतली ती काय जितेंद्र सिंह आणि जे पी नड्डा यांच्यासाठी नाही. सोनम वांगचुक आणि या राजकीय व्यवस्थेविरुद्ध हा त्यांचा हल्लाबोल होता. आणि या आंदोलनात जे शेकडो तरुण तरुणी जखमी
झाले, अनेक मुलींनी या आंदोलनासाठी स्वतःला समर्पित केले होते. त्यापैकी नेहा बोराने 21 दिवस उपोषण केले तिच्या हातून वांगचुक यांनी उपोषण सोडायला हवे होते. ज्या मुलींच्या छातीवर पोलिसानी लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला अशा अनेक मुलींनी त्याग केला त्यांच्या हातून हे उपोषण सोडता आलं असतं. पण सरकारला उपोषण सोडवून घेतल्याचे श्रेय घ्यायचं होतं. अमित शहा आणि नरेंद्र मोदी भयभीत होते. एरवी मोदी देशाला 8 वाजता संबोंधित करतात, काल रात्री 12 वाजला मोदी सोशल मिडियावर आले. 8 वाजेपर्यंत ते भयभीत अवस्थेत होते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
नीट पेपर फुटल्याने 20 जणांचा बळी गेले आहे. त्यांच्या पालकांशी याबाबत आपण बोलले आहोत का? त्या मुलांचे आई वडील, भाऊ, आणि बहीण हे पोलिसांच्या लाठ्या खात होते. त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याशी कुणीच चर्चा केली नाही. म्हणून मी असं म्हणतोय की, भावनेचा उद्रेक हा असा सहज शांत होणार नाही. देशासाठी आणि शिक्षणसंस्थेसाठी सोनम वांगचुक यांचे प्राण अतिशय महत्त्वाचे आहेत. उपोषण सोडले याचा आनंद आहे पण त्यांनी ही लढाई कायम ठेवली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. भाजप या आंदोलनात सहभागी होणार नाही. त्यांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी वांगचुक यांना परदेशी एजंट ठरवलं. ते एजंट ठरवण्यामागे ज्या दोन मंत्र्यांच्या हातून उपोषण मागे घेतले ते सुद्धा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
ज्या सरकारनं जंतरमंतरवरच्या ज्या मंचावरून वांगचुक यांना फरपटत नेलं, सरकारने आंदोलनाची अप्रतिष्ठा करून, बेअब्रू करून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 21 व्या दिवशी कृश झालेले वांगचूक यांच्या भोवती पांढरी चादर उभी करून त्यांना साधं स्ट्रेचरही आणलं नव्हतं, त्यांना फरपटत नेलं. त्या सरकारला दाखवायला पाहिजे होतं, त्याच जागेवर आम्ही आंदोलन सोडू हे दाखवायला पाहिजे होतं. कारण हे आंदोलन एका व्यक्तीचे नव्हे तर देशाचं आंदोलन आहे. एका आंदोलनासाठी जेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ते आंदोलन देशाचं आंदोलन होतं. त्यामुळे त्याच जागेवर येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिच्चून हे उपोषण सगळ्यांच्या साक्षीने हे सोडलं असतं तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजाने तळपून निघाली असती, असे संजय राऊत म्हणाले.
अण्णा हजारे यांचे आंदोलन संपले तेव्हा अण्णाही संपले. सरकारने जर मागणी मान्य करून आंदोलन संपवलं असतं तर या देशाला एक नवी दिशा मिळाली असती. सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू आहे, हे सोनम वांगचुक यांना माहित आहे. एक व्यक्ती या देशातील तरुण वर्गांसाठी 26 दिवस उपोषण करतो, ही आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे.
या देशात पक्षांतर बंदी कायदा आहे, त्यामुळे पक्षांतर थांबली का? या देशात पक्षांतर बंदी कायदा मोडून आमदार खासदार विकत घेतले जात आहेत. मोदींवर कुणी विश्वास ठेवतं का? पक्षांतर बंदी कायदा अत्यंत कठोर आहे. पक्षांतर बंदी कायद्यात कोणत्याही फुटीला आणि परस्पर विलीनीकरणाला मान्यता नाही. मोदी शहा आणि फडणवीस हे पक्ष फोडतात, आमदार खासदार विकत घेतात, लोकसभा अध्यक्ष त्यांना बेकायदेशीरपणे मान्यता देतात, पारित झालेल्या कायद्याशी बेईमानी आहे. त्यामुळे मोदी जे कायदा आणतात ही मोठी बेईमानी आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


























































