विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार; वरूण धवन उतरला मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता अभिनेता वरुण धवन यानेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याने विद्यार्थ्यांच्या आवाजाचा आदर करण्याचे आणि त्यांच्या समस्या न्याय्य व पारदर्शक पद्धतीने सोडवण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

 

वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्या स्वप्नांचा तसेच त्यांच्या संघर्षाचा आदर केला गेला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न उद्ध्वस्त होणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे नुकसान नसून संपूर्ण कुटुंबाच्या आशेवर पाणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर व्यवस्थेकडून अन्याय झाल्याची भावना असेल, तर त्यांना प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्याने नमूद केले. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

 

आपल्या पोस्टमध्ये वरुणने पुढे लिहिले की, “विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. तो समजून घेतला पाहिजे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन न्याय्य, पारदर्शक तोडगा काढावा.” त्याने ही चळवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरतीच मर्यादित राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यासोबतच वरुण धवनने शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क असल्याचे अधोरेखित केले. आंदोलनात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा इतर मुद्द्यांचा हस्तक्षेप होऊ नये, असेही त्याने सूचित केले. आपल्या पोस्टचा शेवट त्याने “जय हिंद” असे म्हणत केला.