
नीट-यूजी 2026 पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे खासदार पवन खेरा यांनी पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एवढ्या दिवसांनी केलेले वक्तव्य आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना शांत करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, “पंतप्रधानांच्या बोलण्याला आता कोण गांभीर्याने घेत आहे? त्यांना बोलू द्या. ते 22 ते 25 दिवसांनी प्रतिक्रिया देत आहेत आणि विचित्र विधाने करत आहेत.” तरुण रस्त्यावर उतरले आहेत त्यामागे गंभीर कारणे आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा संताप कमी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनात सहभाग घेतला. नीट-यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमिततांवर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची भूमिका कायम आहे.



























































