मासिक पाळीदरम्यान थंड पाणी प्यायल्याने पोटदुखी वाढते? जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मासिक पाळी दरम्यान काय खावे आणि काय नाही यावर अनेकदा खूप चर्चा होते. परंतु मासिक पाळीच्या दरम्यान थंड पाणी पिण्यामुळे काही समस्या येऊ शकतात असे आता ऐकिवात येत आहे. प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अनेकदा मात्र मासिक पाळी ही खूप जणींसाठी त्रासदायक ठरते. काहीजणींना तर मासिक पाळीमध्ये खूप तीव्र वेदनांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळीदरम्यान थंड पाणी पिण्यामुळे किंवा थंड पदार्थ खाण्यामुळे रक्ताच्या प्रवाहात अडथळा येतो किंवा पोटदुखी वाढते, असा समज आहे. परंतु तज्ञांच्या मते, मासिक पाळीत थंड पाणी प्यायल्याने रक्तस्राव थांबतो किंवा वेदना वाढतात, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास आणि क्रॅम्प्स हे शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे आणि गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे होतात. मासिक पाळी दरम्यान शरीर हायड्रेट असणे महत्वाचे असते त्यामुळे याकाळात पुरेसे पाणी पीणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान सतत पाणी प्यायल्याने शरीरातील थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या कमी होतात.

मासिक पाळीदरम्यान महिला त्यांच्या आवडीनुसार नेहमीचे किंवा थंड पाणी पिऊ शकतात. मात्र अनेक महिलांना थंड पाणी प्यायल्याने पोटात जडपणा किंवा ब्लोटिंग जाणवू शकतो. अशा महिलांनी कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळू शकतो. तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांनी शरीराला विश्रांती देणे, पौष्टिक आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मासिक पाळीदरम्यान वेदना खूप जास्त असतील तसेच अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा इतर काही गंभीर त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.