धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री, आंदोलक तरुणावर पॅलेट गनने हल्ला झाल्या प्रकरणी राहुल गांधी यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट आणि इतर भरती परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने पॅलेट गनचा वापर झालाच नसल्याचा दावा केला असला तरी, जखमी विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत राहुल गांधी यांनी सरकारवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

दिल्लीतील 10 जनपथबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, “हा तरुण हातात तिरंगा घेऊन शांततेत आंदोलन करत होता. त्याच्यावर पॅलेट गनने गोळी झाडण्यात आली. सरकार म्हणते पॅलेट गनचा वापर झाला नाही, पण सत्य तुमच्यासमोर आहे. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून एका डोळ्याची दृष्टी गेली आहे.”

अशा प्रकारे हजारो तरुणांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला असून त्यांच्यावर लाठीमारही करण्यात आला. हे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत होते. त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून पोलीस भरतीसारख्या परीक्षांची तयारी केली होती. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले.

“ज्यांच्याकडे 60 ते 70 लाख रुपयांची व्यवस्था होती त्यांनी प्रश्नपत्रिका विकत घेतली, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या पेपरफुटीचा फटका देशभरातील लाखो तरुणांना बसला आहे,” असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही तीव्र टीका केली. “धर्मेंद्र प्रधान हे गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या पतनाचे ते प्रतीक आहेत. आज हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्याला तेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या. पहिली मागणी म्हणजे पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवावे. दुसरी मागणी म्हणजे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करणारे आणि लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तर तिसरी मागणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल देशातील तरुणांची जाहीर माफी मागावी.

राहुल गांधी म्हणाले, “या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कष्टाची कमाई खर्च करून त्यांना शिक्षणाची संधी दिली. सरकारने खोटे बोलणे थांबवावे. सरकारने देशाच्या भविष्यावरच हल्ला केला आहे. या तरुणांची काहीही चूक नाही. विद्यार्थ्यांवर हल्ले करणे, त्यांना धमकावणे थांबवा आणि त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा.”

आमची भूमिका स्पष्ट आहे आणि विद्यार्थ्यांचीही भूमिका स्पष्ट आहे. आम्ही त्यांच्या मागण्यांचीच पुनरावृत्ती करत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवलेच पाहिजे. ते देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक बनले आहेत,” असेही राहुल गांधी म्हणाले.