
तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, आमच्या हातात हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर आज भव्य तिरंगा आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरे असे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, “या चार दिवसांत आपण याच जागेवर दुसऱ्यांदा भेटलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी परत भेटणार आहोत. या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक जण सांगतात की, इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये आणि नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची आहे की, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरायला लावून आणि भीती दाखवून जे आतापर्यंत राज्य करत होते, त्यांनी हे दृश्य नक्की पाहण्यासारखं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे? मी म्हणालो, “मैं कुछ बात नहीं करना चाहता। लेकिन ये जन की बात है, ये दिल्ली वालों को सुनना होगा। मी तमाम देशभक्तांना सांगतोय की, दिल्लीमध्ये ज्या बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला… ठीक आहे. मी सरकारला इशारा देतोय; तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढण्याची आजपर्यंत कोणाचीही हिंमत झालेली नाही. या, तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्यासमोर उभे आहोत. बघूया, तिरंगा जिंकतो की, तुमची हुकूमशाही. ठीक आहे, आपण आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत आहोत.”



























































