
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर आज भव्य तिरंगा आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनात बोलताना ते असे म्हणाले.
भाषणाची सुरुवात करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज आम्ही सगळे येथे एकत्र आलो आहोत, याचे एकच कारण आहे, कारण आम्ही दोघे (आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे) आणि आम्ही सगळे येथे उभे आहोत, तुमच्यासोबत. कारण तुम्ही जेव्हा आंदोलन कराल तेव्हा तुम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही. हा देश आमचा आहे आणि आमचाच राहणार आणि कोणीही लाठी चालू शकणार नाही. मला फक्त दोन तीन गोष्टी बोलायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, आपण सगळे आज सोनम वांगचुक यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी त्यांचं उपोषण संपवलं आहे, मात्र २५ दिवस ते आपल्या सगळ्यांसाठी उपोषणाला बसले होते. उपोषण संपलं आहे, मात्र आंदोलन संपलेलं नाही. अभिजित दीपके आणि अनेक तरुण असे आहेत, जे आजही तिथे दिल्लीत बसले आहेत, आपला आवाज तिथे दिल्लीत पोहोचायला हवा. दुसरी गोष्ट, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडीओ टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “तिसरी गोष्ट, काल रात्री किती जणांनी इन्स्टाग्राम व्हिडीओ पाहिला? पाहिला कुणी? लाठ्या खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? अश्रूधुराचा सामना केल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? पेपर फुटल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता काय संविधानावर अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? जेव्हा जेव्हा ते घाबरतात, तेव्हा तेव्हा ते हिंदू-मुस्लिम करतात. तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? जेव्हा जेव्हा ते घाबरतात, तेव्हा ते जाती-धर्माच्या गोष्टी करतात, भाषेच्या गोष्टी करतात, तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? आणि जे संकटाच्या वेळी आपल्यात नसतात तर परदेशात जातात, तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? मग जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत तुम्ही शांत बसणार आहात का?
ते म्हणाले की, “इथे अमित ठाकरे आहेत, मी आहे, संजय राऊत आहेत. अनेक नेते आहेत. पण आमचा सर्वात मोठा आवाज तुम्ही आहात. हे व्यासपीठ आमचं नाही. हे आंदोलन आमचं नाही. कदाचित तुमच्यापैकी बरेच लोक आम्हाला मतदान करत नसतील. आणि तो तुमचा अधिकार आहे. निवडणुकीत जो तुम्हाला योग्य वाटतो, त्याला तुम्ही मतदान करू शकता. हा मतदानाचा विषय अजिबात नाहीये. अशी अनेकदा वेळ येईल जेव्हा तुमचे आणि माझे विचार जुळणार नाहीत. अशीही वेळ येईल जेव्हा आपले मतभेद होतील. पण तरीही मी तुमच्या विरोध करण्याच्या आणि माझ्या विरोधात बोलण्याच्या अधिकाराचा नेहमीच आदर करेन. एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून मी तुमच्या अधिकारांचा नेहमीच आदर करेन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे आणि ही भूमी स्वतंत्र लोकांची भूमी आहे. आपण दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही.”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “प्यार से बात करने आओगे तो प्यार मिलेगा, डराने आओगे तो दर्द मिलेगा! मी आज सर्वांना सांगू इच्छितो की, आज आपण सर्वजण तिरंगा घेऊन आलो आहोत. इथे कोणताही धर्म नाही, कोणतीही जात नाही, कोणतीही भाषा नाही, कोणताही प्रांत नाही, किंवा कोणताही पक्ष नाही. आपण सर्व हिंदुस्थानी आहोत आणि आपण राष्ट्रहितासाठी एकत्र आलो आहोत. एकच गोष्ट मनापासून सांगू इच्छितो. पहिल्यांदाच जेन-झी आणि जेन-अल्फाचा जोश आणि जिद्द खऱ्या अर्थाने अनुभवली आहे.”































































