दखल – कृतार्थ जीवनप्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< सुधीर सेवेकर

‘साकेत’ प्रकाशन ही आजवर मराठी भाषेतील पुस्तकाबरोबरच इतरही अनेक भाषांमधून पुस्तके प्रकाशित करणारी अग्रगण्य संस्था बाबा भांड यांनी सुरू केली. या संस्थेच्या उभारणीत अत्यंत खंबीर आणि धीरोदात पाठिंबा त्यांना मिळाला, तो त्यांची पत्नी श्रीमती आशा भांड यांचा. त्यांनी हा त्यांचा जीवनप्रवास कथन केला आहे. ‘मी आशा’ या पुस्तकातून. रसाळ भाषा, स्वभावातील पारदर्शकता, आपले कुटुंब, सासरी-माहेरचा गोतावळा हे सगळं सांभाळत त्यांनी आपल्या पतीने आरंभिलेल्या प्रकाशन व्यवसायासाठी दिलेले मौल्यवान योगदान, स्वतचे छंद, जगप्रवास, मित्र-स्नेहीजन यांबरोबरच ‘इनरक्लीन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेले समाजकार्य असा एक सविस्तर पट त्यांनी या ग्रंथात मांडलेला आहे. ग्रामीण भागात जन्मलेली आणि सर्वसामान्य परिस्थितीत जन्मलेली मुलगी स्वतचे कष्ट, परिश्रम, लोकोपयोगी वृत्ती यांच्या बळावर सांसारिक आणि व्यावसायिक आव्हानावर मात करू शकते, याचा वस्तुपाठ या पुस्तकातून मिळतो.

पुस्तकात एकूण पंचविसेक प्रकरणे आहेत. पुस्तकाचा प्रारंभ त्यांनी आपल्या वडिलांपासून आणि माहेरच्या घराण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणापासून केलेला आहे. घरण्यातील महानुभवपंथीय संस्कार, ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’चे आचरण, वडिलांच्या सरकारी नोकरीनिमित्त बदल्यांमुळे आशा भांड यांचे थेट रत्नागिरीपासून नांदेडपर्यंतच्या विविध ठिकाणांचे वास्तव्य आणि शाळेतील जीवन यांची हकीकत या प्रकरणात येते. तसेच निजामी राजवट, रझाकारी अत्याचार, यांचेही संदर्भ या प्रकरणात येतात. दुसरे प्रकरण त्यांनी आपल्या आईबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल लिहिले आहे. घराणे नेवासे (जि. अहिल्यानगर). त्यांचे शिक्षण मग शिक्षिकेची स्वीकारलेली नोकरी, तिथेच झालेली बाबा भांड यांची भेट, ते त्यांना तेव्हा कसे शिष्ट वाटले होते, तिथपासून ते या उभयतांचे लग्न ही सगळी हकीकत मोठी सुरस आहे. नंतरची काही प्रकरणे त्यांनी त्यांच्या सासूबाई, भांड कुटुंबीयातील अन्य सदस्य, तेव्हाची संस्कृती, वातावरण यांवर लिहिलेली आहेत. इ.स. 1972 चा दुष्काळ आणि त्याला या सर्व मंडळींनी दिलेले तोंड हे वाचताना वाचक रंगून जातात.

जेव्हा आर्थिक सुबत्ता नसते तेव्हा माणसेच माणसांच्या कामाला येतात. वेणूबाई नामक महिलेचे त्यांना मिळालेले सहकार्य याचा केवळ कृतज्ञपूर्वक हकीकतीसह त्यांनी उल्लेखच केलेला नाही, तर त्यांचे उतराई होण्यासाठी केलेले प्रयत्न हेही त्या विनम्र्रपणे नोंदविले. आपले पती बाबा भांड यांना उभा महाराष्ट्र एक दर्जेदार प्रकाशक, साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष, तंटय़ा भिल्ल, दशक्रिया आणि सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याबाबतचे मौलिक लेखन करणारे लेखक म्हणून ओळखतो हे खरे; पण मुळात बाबा हे एक अत्यंत उद्यमी आणि उपक्रमशील माणूस आहेत. त्यांच्या या उपक्रमांबाबातही आशा भांड यांनी सांगितले आहे. आपली नातवंडे, सून व इतर आप्तस्वकीय यांच्याबद्दलही त्यांनी या ग्रंथात केलेले लेखन विलक्षण हृद्य आहे.

पुस्तकातील कृष्णधवल, रंगीत अशी शेकडो छायाचित्रे व चित्रकार सरदार जाधव, महेश मोघे, धारा मालुंजकर यांची बोलकी कृष्णधवल आणि रंगीत अशी रेखाटनेही आहेत. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथाचे देखणेपण लक्षवेधी झालेले आहे.

‘मी आशा’
लेखिका ः आशा बाबा भांड
पृष्ठे ः 300 किंमत ः रु. 350/-
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर