‘जेन-झी’चा विजयोत्सव, जंतरमंतरवर ‘मेलोडी’ वाटून आनंद साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या सरन्यायाधीशांचे एक वक्तव्य आणि तरुणाई पेटून उठली. झुरळं म्हणून हिणवल्या गेलेल्या तरुणाईने एक आंदोलन उभे केले. ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने थांबले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर करताच जंतरमंतरवर विजयोत्सव सुरू झाला. जंतरमंतरचा परिसर जयघोषाने दुमदुमला.

20 जूनपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले. आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक तरुण 37 दिवसांनी विजयी होऊन परतू लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणांमध्ये उत्साह एवढा संचारला की, काही जणांनी तर पोलिसांच्या बॅरिकेडींची गाडी बनवली आणि त्यावर बसून जल्लोष केला. एक जण तर ऑटो रिक्षावर बसला. ऑटो रिक्षामध्ये गाणे लावण्यात आले होते. गाण्याच्या तालावर तरुणाई मनसोक्त थिरकली. काही तरुणांनी उत्साहाच्या भरात ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही’ पोझ देऊन आनंद व्यक्त केला. अनेक तरुणांनी मनसोक्त नाचत विजयाचा आनंद साजरा केला. आंदोलन संपल्यानंतर माघारी परताना प्रत्येक विद्यार्थी नाचत, गाणे गात परतला.

सुबह हो गई मामू…

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे कळताच दीपके आनंदाच्या भरात व्यासपीठावरच गुडघ्यावर बसले. ‘सुबह हो गई मामू’ असे म्हणत त्यांनी जंतरमंतरवर विजयोत्सवाला वाट मोकळी करून दिली. आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थी परतू लागले. त्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जंतरमंतरचा परिसर स्वच्छ केला.