Tej Pratap Yadav Arrest – मॉलमध्ये फिरताना तेजप्रताप यादव यांना अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, प्रकरण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र, जनशक्ती जनता दलचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजप्रताप यादव यांना अटक करण्यात आली आहे. एका मॉलमध्ये फिरत असताना तेजप्रताप यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तेजप्रताप यादव यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नीट युजी पेपर फुटी प्रकरणाविरोधात पाटण्यातील गांधी मैदानावर पुकारलेल्या आंदोलनादरम्यान तेजप्रताप यादव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते, मात्र रात्री उशीरा एका मॉलमधून ताब्यात घेण्यात आले. न्यायालायने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अटकेच्या प्रक्रियेवर तेजप्रताप यादव यांच्या वकिलांनी गंभीर सवाल उपस्थित केले असून सोमवारी जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तेज प्रताप यादव यांचे वकील जगन्नाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. 26 जुलै रोजी एफआयआर नोंदवण्यात आला, तर अटकेची कारवाई 25 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजताच सिटी सेंटर मॉलमधून करण्यात आली. मी न्यायाधीशांकडे त्यांच्या सुटकेसाठी अर्ज सादर केला होता. परंतु न्यायालयाने सोमवारी जामीन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी नौबतपूर पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा तिथे दोन एसपी उपस्थित होते. मी अटकेचे कारण विचारले असता योग्य उत्तर मिळाले नाही. 25 जुलैच्या संध्याकाळपासून तेज प्रताप पोलिसांच्या ताब्यात आहेत, हे त्यांच्या कुटुंबालाही ठाऊक नव्हते. तसेच आम्हाला अजूनही एफआयआरची प्रत मिळालेली नाही.

बिहारमध्ये विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी नीट पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्लाविरोधात बिहार बंदची हाक दिली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या तेज प्रताप यादव यांना बिहार पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. दरम्यान, या अटकेवर प्रतिक्रिया देताना बांकीपूर पोटनिवडणुकीच्या JJD उमेदवार वीणा मानवी यांनी पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. प्रचार सुरू झाल्यापासून पक्षाच्या नेत्यांचा छळ केला जात आहे. मी अर्ज दाखल केल्यानंतर मलाही अटक करण्यात आली होती. जर विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन निदर्शने केली, तर तो काय गुन्हा आहे? जर गुन्हा झालाच होता, तर पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरूनच का अटक केली नाही? संध्याकाळी कुटुंबासोबत शॉपिंग करताना त्यांना उचलून नेण्याचे काय कारण होते? असा सवाल त्यांनी केला.