
ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील पुरुषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यादरम्यान एक अपघात घडला. हाय बारवर स्टंट करताना 19 वर्षीय इंग्लिश जिम्नॅस्ट गॅब्रिएल लँग्टनचा हात घसरला आणि तो जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेत लँग्टनवर घटनास्थळीच उपचार केले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे काही काळासाठी स्पर्धा थांबवण्यात आली.
सहा वेळा ऑलिम्पिक पदक विजेता मॅक्स व्हिटलॉकच्या जागी गॅब्रिएल लँग्टनचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला होता. इंग्लंड सलग चौथ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष सांघिक विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. इंग्लिश खेळाडूंनी स्पर्धा पूर्ण केली असली तरी, संघाला सुवर्णपदक जिंकता आले नाही. कॅनडाने सुवर्णपदक जिंकले, तर इंग्लंडला रौप्य आणि ऑस्ट्रेलियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

























































