
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात आधुनिक शिक्षण पद्धती आणली, आयआयटी, आयआयएम स्थापन केले. तुम्ही काय केलं? गोशाळा बांधल्या? तरुणांना भजी तळायला सांगितलं. नेहरूंची आधुनिक शिक्षणपद्धती मारून तुम्ही देशाला पुराण काळात नेलं त्यासाठी तुम्ही देशाची माफी मागितली पाहिजे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशातील घडामोडींवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
”नव्या शिक्षण मंत्र्यांचा शिक्षणाशी व यंत्रणेशी किती संबंध आहे ते बघावं लागेल. पेपरफुटीच्या नवीन बिलात लक्षवेधी असं काही नाही. फक्त आकडे बदलले आहेत. पेपर फोडणाऱ्याला पूर्वी एक वर्षाची शिक्षा होती. ती दहा वर्ष केली. एक कोटी दंड दहा कोटी केला. असे कायदे करूनही मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात? पक्षांतर कायदा आहे या देशात. म्हणून मोदी, अमित शहा, सुप्रीम कोर्ट, सरन्यायधीश, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, मिंधे ते या कायद्याचे पालन करतात का? ते कोणत्या कायद्याचं पालन करून राज्य चालवत आहेत. त्यामुळे हा कायदा म्हणजे फक्त रंग सफेदी आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले. मुलींचा विनयभंग करण्याचे आदेश कुणाचे होते.यावर आज संसदेत चर्चा केली पाहिजे. इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही. कोणत्या कायद्याने गौतम अदानींच्या घशात देशाची संपत्ती घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू सरकारने नेमलेले नसून संघाने नेमलेले आहेत अशाने शिक्षणाला कोणतं तेज झळाळी प्राप्त होणार ते मोदी सरकारने जाहीर करावं. मोदी सरकारच्या किती मंत्र्यांची, खासदारांची मुलं परदेशात शिकत आहेत, उद्योग करत आहेत. तुमची मुलं परदेशात सुरक्षित शिकत आहेत. तुम्हाला इथलं शिक्षण नकोय. आमच्या किंवा गरिबांच्या मुलांना इथे शिक्षण घेण्यास सांगताय. आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा. आमची मुलं संघाच्या माध्यमातून जी बोगस शिक्षण पद्धती निर्माण झाली आहे त्यात शिकत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
”जसं नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं. तसं मिस्टर मोदीनी संघाच्या स्वयंसेवकां ऐवजी निलेकनींना करावं शिक्षणमंत्री. अनेक लोकं आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा शिक्षणमंत्री म्हणून विचार करताय तर ते योग्य व्यक्ती आहेत. त्यांनाच शिक्षण मंत्री केलं जाईल. फडणवीस काहीही म्हणत असतील तरी त्यांच्या हातात काही नाही. जेव्हा कमिश्नरचा हवालदार केलं ते त्यांच्या हातात नव्हतं. तेव्हा मोदी शहांनीच त्यांना हवालदार होण्याचे आदेश दिले. भाजपमध्ये स्वाभिमान आहे कुठे. पण या देशाचा शिक्षणमंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनात याक्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आहे. आम्ही मनकवडे आहोत असे समजा”, असे संजय राऊत म्हणाले.
























































