आम्ही मुलांना न्याय दिला, तुम्ही मुलांची डोकी फोडली, लाडक्या बहिणींचं वस्त्रहरण केलं; संजय राऊत यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

NEET पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार विजयी जल्लोष साजरा केला. त्या विजयी जल्लोषावरून टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले. ”आम्ही मुलांना न्याय दिला, त्यामुळे ते आमच्यासोबत जल्लोष करत आहेत. तुम्ही मुलांची डोकी फोडली, लाडक्या बहिणींचं वस्त्रहरण केलं. बघा तुमच्यासोबत जल्लोष करतात का?”, असे संजय राऊत यांनी टीकाकारांना सुनावले आहे.

भाजपवाले धन्यवाद मोदी कॅम्पेन चालवतायत याबाबत पत्रकारांनी विचारले त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, धन्यवाद मोदी कशाकरता? प्रधानांच्या राजीनामा घेणं गरजेचं होतं. ज्या राजीनाम्यासाठी 22 मुलांनी आत्महत्या केल्या, शेकडो मुलींचा विनयभंग झाले, अनेक तरुणांची डोकी फोडली. त्यासाठी धन्यवाद म्हणत असतील तर मी त्यांना धन्यवाद म्हणतो”, असे संजय राऊत म्हणाले.

लाठीहल्ल्याची जबाबदारी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावरच आहे. दिल्ली पोलिसांना आदेश कोण देतं. दिल्ली केंद्रशासित आहे तिथे आदेश फक्त केंद्राचाच चालतो. आम्ही मुलांना न्याय दिला. तुम्ही मुलांची डोकी फोडली. तुम्ही मुलींचे कपडे फाडले. लाडक्या बहिणींचं वस्त्रहरण केलं. तुम्ही मुलांचं अन्नपाणी बंद केलं. मुलांना तुरुंगात टाकलं. आम्ही मुलांसोबत जल्लोषात सामील झालो. तुम्हाला मुलं जल्लोषात सामील करून घेणार का ते विचारा? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

”आम्ही भलेही बेगानी शादीमधले अब्दुल्ले असू. पण तुम्ही कुठे आहात? तुमच्या दाढीला जंतरमंतरच्या मुलांनी आग लावली. धूर निघतोय. त्यामुळे गप्प रहा, असे देखील संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले.