
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रात इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचा दावा केला जात आहे. बारावीच्या परीक्षेत 45 ते 50 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी राज्य सामाईक म्हणजे ‘एमएच-सीईटी 2026’ परीक्षेत टॉपर झाल्याची माहिती पुढे आली आहे. 99 ते 100 पर्सेंटाईल मिळविण्यासाठी 12 ते 13 लाखांत डील करून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यात येत असल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात झालेल्या सीईटी परीक्षेत गडबड घोटाळा झाल्याचा दावा काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी सर्वात आधी समोर आणला होता. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत जेमतेम 35 ते 40 टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना सीईटी परीक्षेत चक्क 90 ते 100 पर्सेंटाईल कसे काय पडू शकतात? असा प्रश्न करत त्यांनी याबाबत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सीईटी परीक्षेचा मुद्दा आमच्याकडे देखील आला असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांनी सीईटी परीक्षेत कशाप्रकारे घोटाळा झाला याबाबतचा एका शिक्षकाचा व्हिडीओ ‘एक्स’ हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माहिती सांगणाऱया शिक्षकाने मी पुराव्यानिशी बोलत असल्याचा दावा केला आहे. 10 वी 12 वीत ज्यांना चांगले मार्क नाहीत त्यांना सीईटी परीक्षेत 99 पर्सेंटाईल कसे, असा थेट सवाल या शिक्षकाने केला आहे.
व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमध्ये काय?
- एका व्हिडीओमध्ये 12 वीच्या परीक्षेमध्ये 45 ते 50 टक्के गुण मिळविणाऱया काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत 90 ते 100 टक्के मार्क मिळाल्याचे पुराव्यानीशी दाखवून दिले आहे.
- एका ऑडिओ क्लिपमध्ये 12 ते 13 लाखांत सीईटी परीक्षेसाठी विशिष्ट परीक्षा केंद्र मिळवून देऊन त्याद्वारे चांगल्या गुणांची हमी आणि नामांकित महाविद्यालयात प्रवेश देण्याचा दावा केला जात आहे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
या कथित व्हायरल व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमुळे सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीईटी मार्फत अभियांत्रिकी, कृषी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया परीक्षांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन परीक्षांतील गुणांची तुलना चुकीची, सीईटी सेल आयुक्तांनी आरोप फेटाळले
बारावी आणि सीईटी या दोन परीक्षांतील गुणांची तुलना करणेच मुळात चुकीचे आहे, असे सांगत सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सोशल मीडियामधील पोस्ट आणि विरोधकांकडून करण्यात येत असलेले आरोप फेटाळून लावले.
काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेत जास्त गुण असतात. एका परीक्षेत असलेल्या परफॉर्मन्सप्रमाणे दुसऱया परीक्षेतही तसाच परफॉर्मन्स दिला पाहिजे ही अपेक्षा काही योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज या दोन्ही पद्धती वेगळ्या आहेत. पर्सेंटाइल पद्धती ही त्या त्या बॅचसाठी असते, त्यामध्ये जो टॉपर असतो, त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. मग त्याचा मूळ स्कोअर (रॉ स्कोअर) 70, 80 किंवा 90 टक्के, कितीही असू शकतो. पण तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. याचा अर्थ असा नव्हे की 100 टक्के मार्क मिळालेत, असं सरदेसाई म्हणाले.
सीआयडी चौकशी होणार
सीईटी परीक्षेतील घोटाळ्याची राज्याचे उच्च व तंत्रिशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सीआयडी चौकशी करण्याची तयारीदेखील त्यांनी दर्शविली आहे.
सीईटी सेलची सायबर पोलिसांत धाव
सीईटा निकालाबाबत व्हायरल होत असलेला व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिपमधील दाव्याबाबत सीईटी सेलने आझाद मैदान पोलीस ठाणे तसेच राज्य सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित दाव्यांची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.































































