तमिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका भामट्याने सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नवीन संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी महिलांना मुंडण करण्यास सांगितले. या बदल्यात त्यांना भरघोस आर्थिक मदतीचे आमिष दाखवण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून करून दिली. त्याने संबंधित महिलांचे नाव आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती आधीच माहीत असल्यासारखी भासवले. ज्यामुळे महिलांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. कोरोनासारखाच एक नवीन भयानक आजार केसांमधून पसरत असल्याचा खोटा दावा त्याने केला. या आजारापासून वाचण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी टक्कल करणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले. तसेच इतर देशांमध्येही लोकांनी अशीच काळजी घेतल्याचे त्याने भासवले.
तमिळनाडू सरकारकडून यासाठी विशेष आर्थिक मदत दिली जात असल्याचा बनाव या भामट्याने रचला. ज्या महिला मुंडण करतील त्यांना 15 हजार रुपये, विद्यार्थिनींना 45 हजार रुपये आणि लॅपटॉप तर, पुरुषांना 6 हजार रुपये मिळतील असे आमिष दिले. महिलांच्या होणाऱ्या फसवणुकीची माहिती मिळताच गावातील सुमारे 20 जणांनी मुंडण करण्याची तयारी दर्शवली, त्यापैकी तीन महिलांनी प्रत्यक्षात आपले केस काढून टाकले.
महिलांनी मुंडन केल्यानंतर जेव्हा पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. महिलांनी त्या भामट्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन बंद लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
























































