नालासोपाऱ्यातील तुळशी रिसॉर्टमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार, भिवंडीतील व्यावसायिकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपारा परिसरातील कळंब गावातील तुळशी रिसॉर्टमध्ये मध्यरात्री दारूच्या पार्टीदरम्यान गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली, तरी या प्रकारामुळे रिसॉर्ट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील संदेश गुरव ( वय ३२) हा आपल्या मित्रांसह पार्टीसाठी तुळशी रिसॉर्टमध्ये आला होता. संदेश गुरव हा बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय करत असून त्याची पत्नी सरपंच असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास दारूच्या नशेत आणि अतिउत्साहाच्या भरात संदेश गुरव याने स्वतःकडील बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली.

यावेळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल समुद्रकिनारा परिसरात गस्त घालत होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी तातडीने तुळशी रिसॉर्टकडे धाव घेतली. मात्र तेथील उपस्थित असलेल्यां कडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता त्यांना वापरलेल्या काडतुसाची रिकामी भोंगळी आढळली. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी संदेश गुरव याच्याकडून बिनपरवान्याची गावठी रिव्हॉल्व्हर आणि आणखी जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यानंतर पोलिसांनी संदेश गुरव याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५ तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत बिनपरवान्याचे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अर्नाळा सागरी पोलीस करत असून आरोपीकडे हे शस्त्र कसे आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि शस्त्राचा स्रोत कोणता आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी याच रिसॉर्टमध्ये चिमुकल्याचा बुडून मृत्यू

दरम्यान, कळंब येथील याच तुळशी फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये मे महिन्यात स्विमिंग पूलमध्ये पडून अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा याच रिसॉर्टमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.